मुंबई शहर आणि उपनगरात एचएमपीव्ही बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे. नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र यांनी श्वसनांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील सूचनांचे निवेदन प्रसिध्द केलं आहे.
हे करा-
● जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.
● साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
● ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे.
● भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.
● संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुवीजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.
हे करू नये-
● हस्तांदोलन.
● टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.
● आजारी लोकांशी जवळचा संपर्क
● डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
● सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.