भाजपा नेत्या रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्यात दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुप्ता यांच्यासह ६ कॅबिनेट मंत्र्यांनीही आज शपथ घेतली. यामध्ये परवेश साहिब सिंह वर्मा, आशीष सूद, मनजिन्दर सिंह सिरसा, रविंद्र इन्द्राज सिंह, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार यांचा समावेश आहे. शपथविधीनंतर लगेच गुप्ता यांनी पदभार स्वीकारला आणि खातेवाटप जाहीर केलं. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासह गृह, वित्त, नियोजन यासारखी महत्त्वाची खाती असतील. परवेश वर्मा यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम तसंच परिवहन विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. गुप्ता यांनी संध्याकाळी वासुदेव घाटावर यमुना आरती केली.