भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान, आणि गरीबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलत होते.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार, महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश केला जाणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी, २५ लाख रोजगारांची निर्मिती, अशी अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत.
महाविकास आघाडीची अनेक आश्वासनं ही केवळ लोकानुनयासाठी असून ती प्रत्यक्षात उतरणारी नसल्याची टीकाही शाह यांनी केली. खोटं फार काळ टिकत नसल्यामुळेच २०२२ साली महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यावेळी उपस्थित होते.