आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं 99 उमेदवारांची आपली पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कामठी मतदारसंघामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, तर बल्लारपूरमधून मंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपानं काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.
मुंबईत, वांद्रे पश्चिम मधून आशीष शेलार, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, कुलाब्यातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर पुण्यात कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे, आणि पर्वती मतदार संघात माधुरी मिसाळ यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडमधून शंकर जगताप, भोसरी मधून महेश लांडगे तर दौंड मधून राहुल कुल यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे.इचलकरंजीतून राहुल आवाडे, केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.नांदेड जिल्ह्यात भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
नाशिकमध्येही नाशिक पूर्व मधून आमदार ॲड. राहुल ढिकले, नाशिक पश्चीममध्ये सीमा हिरे, चांदवड- देवळा मतदार संघातून आमदार डॉ. राहुल आहेर तर बागलाणमधून आमदार दिलीप बोरसे यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे.
सोलापुरात दक्षिण सोलापूरसाठी सुभाष देशमुख, शहर उत्तर विधानसभेसाठी विजयकुमार देशमुख तर अक्कलकोट विधानसभेसाठी सचिन कल्याणशेट्टी यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.धुळ्यातही शिंदखेडा मध्ये आमदार जयकुमार रावल, धुळे शहर मतदार संघात अनुप अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. शिरपुर मतदार संघातून माजी आमदार काशीराम पावरा यांना भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
.