१८ व्या लोकसभेचे सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची काल आवाजी मतदानानं निवड करण्यात आली. सभापती म्हणून संसदीय मूल्यं आणि लोकशाही परंपरांचं पालन करण्याला आपलं प्राधान्य असेल असं बिर्ला यांनी आपल्या आभाराच्या भाषणात सांगितलं. लोकसभेच्या कामकाजात अडथळे आणण्यापेक्षा चर्चेचा मार्ग अवलंबला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं.
१९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादण्याच्या घटनेचा निषेध करण्याचा प्रस्ताव नंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहात मांडला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा तो निर्णय घटनेवर हल्ला होता असं बिर्ला म्हणाले. त्यामुळे कामकाजाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. या गदारोळानंतर बिर्ला यांनी आणीबाणीच्या निषेधार्थ दोन मिनिटं मौन पाळण्याची घोषणा केली आणि त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं.