भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं आज वार्धक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या महिन्यापासून मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. नाशिक इथं खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पिचड यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पशुधन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विकास आणि अन्य खात्यांचं मंत्रिपदही त्यांनी भूषवलं होतं. पिचड यांचं पार्थिव अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथं पक्ष कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून संध्याकाळी ४ वाजता राजूर इथं अंत्यविधी होईल.
Site Admin | December 6, 2024 8:16 PM | Madhukar Pichad | Passed Away