संसदभवन परिसरात काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी रालोआच्या खासदारांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत या दोन भाजपा खासदारांना निदर्शनादरम्यान जखमी केल्याचा आरोप केला. याशिवाय राहूल गांधी यांनी भाजपाच्या आदिवासी खासदार फंगॉन कोन्याक यांच्याशीही वाईट वर्तन केल्याची तक्रार कोन्याक यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांकडे केल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं.
या प्रकरणातून भाजपा केंद्रीय गृहमंत्र्यांचा डॉ आंबेडकरांवरचा शेरा तसंच अदानी ग्रुप वरचे लाचखोरीचे आरोप अशा मुद्द्यांला बगल देण्याचा प्रयत्न करता आहे अशी प्रतिक्रिया राहूल गांधी यांनी व्यक्त केली आहे. भाजपाचे खासदार संसद भवनाच्या प्रवेशद्वार अडवून उभे होते आणि त्यांनी आपल्याला आत जाऊ दिले नाही असंही ते म्हणाले.