जगाच्या कल्याणासाठी बिम्सटेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बँकॉक इथं सहाव्या बिम्सटेक संमेलनात आज ते बोलत होते. बिम्सटेक ही दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांची संघटना असून सदस्य देशांमधे सहकार्यासाठी २१ कलमी कार्यक्रम प्रधानमंत्र्यांनी प्रस्तावित केला.
बिम्सटेक चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेची घोषणा करुन त्यांनी सांगितलं की त्याची व्यावसायिक बैठक दरवर्षी होईल. आपत्ती व्यवस्थापन, शाश्वत सागरी वाहतूक, पारंपरिक औषधं आणि कृषी संशोधन आणि प्रशिक्षण या विषयांवर बिम्सटेक उत्कृष्टता केंद्र भारतात स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यात बिम्सटेक देशातल्या ३०० तरुणांना कौशल्य विकासाची संधी देण्यासाठी बोधी या नवीन कार्यक्रमाची घोषणाही मोदी यांनी केली. या अंतर्गत व्यावसायिक, विद्यार्थी, संशोधक आणि राजनयिकांना प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. तसंच दरवर्षी भारतात बिम्सटेक पारंपरिक संगीत उत्सव आयोजित केला जाईल असं ते म्हणाले. म्यानमार आणि थायलंडमधल्या विनाशकारी भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल मोदी यांनी यावेळी शोक व्यक्त केला. बिम्सटेक गटाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री पेतोंगटार्न शिनावात्रा यांचे आभार मानले.
बिम्सटेक परिषदेनिमित्त तिथं आलेले बांगलादेशाचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांच्याशी मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यात प्रधानमंत्र्यांनी काल थायलंडच्या प्रधानमंत्री पेतोंगतार्न शिनावात्रा यांच्याशी उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली. थायलंडचा दौरा आटोपल्यानंतर प्रधानमंत्री मोदी श्रीलंकेला रवाना झाले आहेत. चालू कार्यकाळातली ही त्यांची चौथी श्रीलंका यात्रा आहे.