बिहार आणि उत्तर प्रदेशात पूरपरिस्थिती कायम असल्यानं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गंगा नदी परिसरातल्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करून या भागात तातडीनं बचाव आणि मदतकार्य सुरु करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गंगा आणि इतर नद्यांना आलेल्या पूरामुळे पाटणा, बक्सर, वैशाली, बेगुसराय, नालंदा हे जिल्हे जलमय झाले आहेत.
उत्तर प्रदेशात २६ जिल्ह्यांना पूराचा तडाखा बसला असून त्यामुळे सुमारे ५ लाख लोक प्रभावित झाले आहेत. बलिया जिल्ह्यात शरयु नदीच्या पुरात राष्ट्रीय महामार्ग ३१ चा सुमारे २० मीटर भाग वाहून गेल्यानं मांझी पुलावरून होणारी वाहतूक खंडित झाली आहे.