तरुण पिढीनं आपली प्रतिभा, नवनिर्मिती आणि क्षमता, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वापरण्याची गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत ‘आयडियाज फॉर लाईफ’ या मोहिमेसंबंधीच्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. २०२१मध्ये ग्लासगो इथं झालेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही संकल्पना मांडली होती. जागतिक पातळीवर हवामान बदल रोखण्यासाठी या मोहिमेत समाविष्ट करण्यात आलेल्या ७ विषयांची माहिती यादव यांनी यावेळी दिली. तसंच या विषयांवर आधारित कल्पना Ideas4Life.nic.in या संकेतस्थळावर नोंदवण्याचं आवाहन केलं. यातल्या उत्तम कल्पनांना खास पारितोषिकंही दिली जाणार आहेत.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन रोखणं अतिशय महत्त्वाचं असून त्यासाठी प्रत्येकानं आपलं ‘कार्बन फुटप्रिंट’ मोजावं आणि त्याची नोंद ठेवावी, असं आवाहन आय आय टी मुंबईचे संचालक शिरीष केदारे यांनी या कार्यक्रमात केलं.