आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांनी संविधान, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाजपावर आरोप करताना खोटा प्रचार केला, तो पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी हा प्रचार खोडून काढला पाहीजे असं ते म्हणाले. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपली मतं स्पष्ट करावीत असं ते म्हणाले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सकाळच्या सत्रात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं हे महाअधिवेशन बोलावलं आहे. आज सकाळी अधिवेशनाचं उद्घाटन झालं. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भाजपाचे नेते गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह, भाजपाचे ५ हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीआधी भाजपाच्या वतीनं राज्यभरात काढल्या जाणाऱ्या संवादयात्रांच्या आराखड्याला या अधिवेशनात अंतिम स्वरूप दिलं जाण्याची शक्यता आहे.