डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रदेश भाजपाचं अधिवेशन शिर्डी इथं सुरु

प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनाला शिर्डी इथं आज सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुुरुवात झाली. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तसंच राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं.

 

विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं शिवशाही स्थापन करण्यासाठी अभूतपूर्व यश दिलं आहे. भाजपाच्या आतापर्यंतच्या इतिहासाचं हे सुवर्णशिखर आहे, असं भाजपाचे ज्येष्ठे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपाचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राचं सुराज्यात रुपांतर करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं गडकरी यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची आहे. या स्वप्नाचा संबंध हा शिवशाही आणि रामराज्याशी आहे, असंही गडकरी म्हणाले. भविष्यातला महाराष्ट्र बनवायचा संकल्प आज आपण करू, असं आवाहन त्यांनी केलं.

 

विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेने विजयी कौल दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी हे अधिवेशन आहे, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊनही पक्षाचा पराभव झाला, मात्र या पराभवातून आपण शिकलो आणि अधिक जोमाने विधानसभा निवडणुकीत कामाला लागलो. यामुळे या निवडणुकीत पक्षाला यश मिळालं, श्रद्धा आणि सबुरीच्या जोरावर भाजपाने महाभरारी घेतली आहे, असं बावनकुळे म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा