प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतराष्ट्रीय सहकार संघटनेच्या, जागतिक सहकार परिषदेचं उदघाटन होणार आहे. सहकारातून सर्वांची समृद्धी ही या सहा दिवसीय परिषदेची संकल्पना आहे. संघटनेच्या १३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच या परिषदेचं आयोजन भारतात केलं जात आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे.
भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपप्रधानमंत्री मनोआ कामिकामिका हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देश विदेशातले सुमारे ३ हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज आहे.