भंडारा जिल्ह्यातल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात गेल्या २४ जानेवारीला झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा स्फोट यंत्र आणि उपकरणांची दुरुस्ती करण्यात झालेल्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गुन्हा दाखल करण्यात आलेले चारही अधिकारी संरक्षण उत्पादन विभागातील आहेत.
स्फोटानंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या निष्कर्षावर आधारित हा एफआयआर नोंदवण्यात आला.
इमारत क्रमांक २३ मधील आरएक्स विभागातील यंत्र आणि उपकरणे खराब झाली होती. परंतु त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तसंच विभागाच्या अत्यंत संवेदनशील भागात काम करण्यासाठी प्रशिक्षणार्थींची नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे हा स्फोट झाल्याचं चौकशीत आढळून आलं आहे.
२४ जानेवारीला शस्त्रास्त्र कारखान्यात झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते.