७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. आट्टम या मल्याळी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘ऊँचाई’ या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ‘तिरुचित्रमबलम’ या चित्रपटासाठी नित्या मेनन आणि ‘कच्छ एक्सप्रेस’ चित्रपटासाठी मानसी पारेख सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटासाठी रिषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला.
परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केलेला वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला असून कथाबाह्य चित्रपट विभागात सोहिल वैद्य दिग्दर्शित ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ म्हणजेच ‘आदीगुंजन’ या मराठी माहितीपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा मान मिळवला आहे. याच माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना सर्वोत्कृष्ट निवेदनासाठी पुरस्कार जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट कला-संस्कृतीविषयक चित्रपटाचा मान सचिन सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ या शिवकालीन युद्ध कलेवर आधारित मराठी चित्रपटानं पटकावला. तर ‘आणखी एक मोहेंजोदारो’ हा सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट ठरला आहे.