बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसंच कराड याचा ताबा एसआयटीकडे देण्याचा निर्णय न्यायालायने घेतला आहे. प्रोडक्शन वॉरंट दाखवून कराड याचा ताबा एसआयटीकडे दिला जाईल, असं सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी सांगितलं.
खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला केज इथल्या न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कराडला १४ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर परळी शहरात कराड समर्थकांनी टायर जाळून निषेध केला. या आंदोलनामुळे परळी शहरातल्या बाजारपेठा आज बंद होत्या. आंदोलकांनी बसवर दगडफेक केल्यानं परळी बस स्थानकामधून होणारी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याच्या एका समर्थकानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या समर्थकाला ताब्यात घेतलं आहे.
वाल्मिक कराड याच्यावरचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी त्याची आई पारूबाई कराड या बीड जिल्ह्यातल्या परळी इथं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आहेत.