मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय आणि सर्वधर्मिय मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली.
शहरातील प्रमुख मार्गांवरून हा महामूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यावर, त्याचं सभेत रूपांतर झालं. खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, छत्रपती संभाजीराजे, मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
आम्हाला बीडचा बिहार होऊ द्यायचा नाही, त्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्री पद आमदार धनंजय मुंडे यांना देऊ नये अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची गांभीर्यानं घेऊन वेळीच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर राज्यभर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.