टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ५० धावांनी विजय
टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा ५० धावांनी सहज पराभव केला. अँटीग्वा इथल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात १९६ धावांचं मोठं आव्हान बांगलादेशसमोर ठेवलं. हार्दिक पंड्यानं फक्त २७ चेंडूंमध्ये ५० धावा फटकावल्या, तर ऋषभ पंतनं २८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकांमध्ये ८ गड्यांच्या मोबदल्यात १४६ धावाच करता आल्या. हार्दिक पंड्या सामनावीर ठरला.
आज सकाळी झालेल्या सामन्यात अफगणिस्ताननं ऑस्ट्रेलियाच्या संघावर २१ धावांनी मात केली. जमैकात किंगस्टन इथं झालेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं निर्धारित २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ १९ षटकं आणि २ चेंडूंमध्ये १२७ धावांवरच गारद झाला. सामनावीर ठरलेला अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू गुलबदीन नईब यानं चार गड्यांना तंबूत धाडलं.