सर्वजण एकत्र राहून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करू, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममधल्या पोहरा देवी इथं केलं. राज्यातल्या डबल इंजिन ८सरकारनं नागरिकांच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. नदी जोड प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १८ व्या, आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ५ व्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्र्यांनी आज केलं. तसंच कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत १ हजार ९२० कोटी रुपयांचे साडे सात हजाराहून अधिक प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केलं.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणाऱ्या १९ मेगावॅट क्षमतेच्या ५ सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, बुलढाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यात हे सौर प्रकल्प आहेत. हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारायला मदत करणाऱ्या ४११ ग्राम पंचायतींना प्रधानमंत्र्यांनी २० कोटी ५५ लाख रुपये विकासनिधी दिला. त्यापूर्वी बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन त्यांनी केलं. या ४ मजली संग्रहालयात बंजारा समाजाची माहिती देणारी १३ प्रदर्शनं आहेत. प्रधानमंत्र्यांनी यावेळी जगदंबा देवी आणि सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं. तसंच बंजारा समाजातल्या मान्यवरांची भेट घेतली.
यावेळी बोलताता त्यांनी बंजारा समाजातल्या संतांच्या योगदानाची आठवण काढली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दात टीका केली. महाविकास आघाड़ी सरकारनं शेतकऱ्यांच्या विविध योजनांमध्ये, सिंचन प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार विकासासाठी कार्यरत आहे. काँग्रेस नागरिकांना गरीबीत ठेवू इच्छितं, असा आरोप त्यांनी केला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचं वितरण केलं.