बांगलादेशची संसद बरखास्त करून हंगामी सरकार स्थापन केलं जाईल, असं बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी म्हटलं आहे. ढाका इथल्या बंगभवन इथं तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत काल त्यांनी ही माहिती दिली. बांगलादेशमधली सध्याची अराजकता दूर करण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. नजरकैदेत असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची सुटका करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे आदेशही राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी दिले.
दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा देऊन लष्करी विमानातून देश सोडला. बांगलादेशमधल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्करानं पावलं उचलली. लष्कर प्रमुख जनरल वकार-उझ-जमान लवकरच विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रतिनिधींची भेट घेणार असल्याचं लष्कराच्या जनसंपर्क विभागानं म्हटलं आहे. तसंच आज सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, खाजगी कार्यालये, कारखाने, शाळा, महाविद्यालये, मदरसे आणि विद्यापीठांसह सर्व शैक्षणिक संस्था सुरू राहतील, असंही जनरल जमान यांनी सांगितलं.