बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी तिथली संसद बरखास्त करुन हंगामी सरकारच्या प्रधानमंत्रीपदी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांची नेमणूक केली आहे. लष्कराच्या तिनही दलांचे प्रमुख आणि विद्यार्थी संघटनांच्या शिष्टमंडळासोबत काल झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मोहम्मद युनुस यांनी ग्रामीण बँकांच्या माध्यमातून गरीबीविरोधी मोहीम राबवल्याबद्दल २००६ मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
सरकारमधल्या अन्य मंत्र्यांची निवड विविध राजकीय पक्षांशी सल्लामसलत करुन केली जाईल, अशी माहिती राष्ट्रपतींच्या जनसंपर्क सचिवांनी माध्यमांना दिली. दरम्यान बांग्लादेशच्या माजी प्रधानमंत्री खालिदा झिया यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात आली आहे.
लष्कराने सत्तेची सूत्रं हाती घेतल्यानंतर देशातल्या अनेक भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात ४४० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ढाका इथल्या भारतीय उच्चायुक्तालयातले आवश्यक नसलेले कर्मचारी आणि कुटुंबं भारतात परतले आहेत.