बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं येत्या शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते.
राज्यात लहान मुलं, महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणात अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळं हा बंद पुकारल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
याच मुद्द्यावर काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्यानं सरकारनं राजीनामा द्यावा, अशी मागणी वड़ेट्टीवार यांनी केली. याप्रकरणी नियुक्त झालेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे भाजपाचे आहेत या कारणावरुन त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.