विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात सुरु केलेल्या आत्मक्लेश उपोषणाची आज सांगता झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण सुरू झालं होतं. महायुती सरकारने सार्वजनिक पैशांची उधळपट्टी केली, राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी आपलं उपोषण आहे, असं आढाव यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर, जिंकलेले आणि पराभूत अशा दोघांचाही विश्वास नाही असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मतदान यंत्रात नोंदवलेलं मत तपासण्याची सोय नाही, यंत्राचा वापर संशयास्पद आहे, असा आरोपही त्यांनी केला. मतदानाच्या दिवशी शेवटच्या काही तासात वाढलेल्या मतदानावरही ठाकरे यांनी संशय व्यक्त केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन वार्ताहरांशी संवाद साधला. संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारल्या जात नाहीत, याचा अर्थ देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नाही , अशी टीका पवार यांनी केली. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे, मात्र यातून काही निष्पन्न होईल असं वाटत नाही असं पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यावेळी कुणीही मतदान यंत्रावर शंका घेतली नाही. जनतेचा कौल पाच महिन्यात बदलला त्याला आपण काय करणार असं अजित पवार यावेळी म्हणाले. विरोधकांनी केलेले सर्व आरोप पवार यांनी फेटाळून लावले.
बाबा आढाव यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगली इथं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.