दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
दिल्ली विधानसभेच्या काल जाहीर झालेल्या निकालात भाजपाने जवळपास तीन दशकांनंतर जोरदार पुनरागमन करत ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला, आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं, तर काँग्रेसला भोपळा फोडण्यात अपयश आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर भाजपा सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. दिल्लीत भाजपाला मिळालेला विजय हे भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर देशाच्या असलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल दिल्ली भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना केलं.
दरम्यान, काल जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालात उत्तर प्रदेशातल्या मिलकीपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे चंद्रभानू पासवान विजयी झाले आहेत, तर तमिळनाडूच्या इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघातून द्रविड मुन्नेत्र कळगम पक्षाचे चंदिराकुमार व्ही. सी. यांनी बाजी मारली आहे.