मुक्त, खुलं, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद – प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा एक सामायिक प्राधान्यक्रमावरचा विषय आहे, आणि त्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेत डेलावेर इथं झालेल्या क्वाड देशांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सध्या जग तणाव आणि संघर्षानं वेढलेलं असताना ही परिषद होत आहे, अशावेळी क्वाड सदस्य देशांनी सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर एकत्र काम करणं संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. एका संघटनेच्या माध्यमातून एकत्र येणं याचा अर्थ कोणाच्याही विरोधात जाणं नाही, त्याउलट एकत्र येत काम करण्याचा अर्थ हा, नियमाधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर आणि सर्व समस्यांचे शांततापूर्ण निराकरण करण्याला पाठबळ देणं असं आहे, असं ते म्हणाले.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी क्वाड संघटनेनं आरोग्य, सुरक्षा, अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, हवामान बदल आणि क्षमतावृद्धी सारख्या क्षेत्रांसाठी केलेल्या उपायोजनात्मक नियोजनाचा उल्लेख केला. २०२५ मध्ये क्वाडची शिखर परिषद भारतात होणार असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान क्वाड ही जागतिक कल्याणासाठीची शक्ती असल्याचं एकमत सर्व सदस्य देशांनी व्यक्त करत, काल या शिखर परिषदेचा समारोप झाला. यावेळी सर्व सदस्य देशांच्या नेत्यांनी एकमतानं हिंद – प्रशांत क्षेत्रासह संपूर्ण जागतिक समुदायाच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या अनेक घोषणा केल्या. याअंतर्गत क्वाड कॅन्सर मूनशॉट उपक्रम, भारत प्रशांत क्षेत्रात क्षेत्रात भागधारकांना संसाधनं पुरवण्यासाठीचा मैत्री हा उपक्रम तसंच सागरी प्रशिक्षणासह इतर महत्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे. दरम्यान डेलावेर इथली क्वाड शिखर परिषद आणि इतर कार्यक्रम आटोपून प्रधानमंत्री न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. ते आज एका कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत.