राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास नाके उभारण्यात आले असून सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची १२० जवानांची तुकडी जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहे. तसंच सर्व मतदार केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सांगली जिल्ह्यात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून प्रशासनाच्या सूचनांचं पालन सर्व राजकीय पक्षांनी करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक माध्यमं, समाजमाध्यमांवर उमेदवारांच्या जाहिराती प्रसारीत करण्याआधी परवानगी घेणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नवी मुंबईत विनापरवानगी लावलेल्या अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्याची कारवाई महापालिकेने सुरु केली आहे. आचार संहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत ४ हजार ४१८ अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्ज काढून टाकले असून सार्वजनिक भिंतीवरची चित्र, लेखन, झेंडे, कमानी देखील हटवण्यात आल्या आहेत.