केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरयाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२४ अशा तीन टप्प्यात मतदान होईल. जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ असे एकूण ९० मतदारसंघ आहेत. काश्मिरी पंडित आणि पीओके मधील विस्थापितांसाठी नायब राज्यपालांकडून एकूण तीन जागांवर उमेदवार दिले जातील. त्यामुळे या राज्यात एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.
हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन्ही राज्यांची मतमोजणी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
यापूर्वी हरयाणा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यात आल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रातली पावसाची स्थिती आणि सणांमुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका हरयाणासोबत घेत नसल्याची माहिती राजीव कुमार यांनी या वार्ताहर परिषदेत दिली.