आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७२ वर गेली आहे. राज्यात २७ जिल्ह्यांमधल्या २२ लाख नागरिकांना अजूनही पुराचा धोका आहे. पुरामुळे ४९ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. १२७ रस्ते आणि २ पुलांचंही नुकसान झालं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांनी काल २१८ जणांची सुटका केली. ब्रह्मपुत्रा, आणि बराक, तसंच त्यांच्या उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
राज्य सरकारनं २४५ मदत शिबिरं आणि २९८ मदत वाटप केंद्र स्थापन केली आहेत. सध्या ५३ हजारांपेक्षा जास्त नागरिक मदत शिबिरांमध्ये आहेत. आसामच्या पूरग्रस्त भागातील नागारिकांच्या पुनर्वसनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लवकरच विशेष निधी जाहीर करतील, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा,गृहनिर्माण आणि शहरमंत्री मनोहर लाल यांनी आज गुवाहाटी इथं दिली. पूरग्रस्त भागाची हवाई पहाणी केल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.
उत्तर प्रदेशमध्ये सहा जिल्ह्यांतल्या दोनशे गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. श्रावस्ती इथल्या ४४ हजार, तर लखिमपूर खिरीमधल्या ३० हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राजस्थान आणि उत्तराखंड मध्येही अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज पूरग्रस्त कुमाऊ भागाची हवाई पहाणी केली.