सीडॅकने विकसित केलेल्या तेजा जेएएस ६४ या चीपचं आणि नोवा डेव्हलपमेंट बोर्डचं उद्घाटन आज केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. त्यांनी आज पुण्यातल्या सी-डॅक अर्थात प्रगत संगणक विकास संस्थेच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातल्या शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. सीडॅक मधील सुपर काॅम्पुटर तंत्रज्ञान विकासासाठी आणि औद्योगिक कंपन्यांना आवश्यक चीप आणि अन्य तांत्रिक उपकरणांच्या विकासाबाबत सीडॅकमध्ये सुरू असलेल्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला.
इलेक्ट्राॅनिक कंपन्यांना आवश्यक असलेल्या इलेक्ट्राॅनिक चीपस् आणि सेमीकंडक्टर विकसित करण्यासाठी रांजणगांव इथं इलेक्ट्राॅनिक क्लस्टरची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने देशात पाच प्रयोगशाळाही विकसित करण्यात येणार असून नॅशनल सुपर काॅम्पुटींग मिशन ही प्रगती पथावर असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, पुणे नाशिक रेल्वेमार्गावर असलेली नारायणगाव इथली जीएमआरटी प्रयोगशाळा अन्य ठिकाणी हलवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं विद्यापीठ बनवण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्यात केलं. या संस्थेला विद्यापीठाचं बळ मिळालं तर अधिकारांचंही सक्षमीकरण होण्यासाठी मदत होईल, असं त्यांनी म्हटलं. यावेळी टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी वैष्णव यांच्या हस्ते मुख्य ऑडिटोरियमचं उद्घाटन झालं.