विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर पक्षीय राजकारणाचा प्रभाव नसावा असं मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विद्यार्थ्यांपेक्षा मालकाचं हित जोपासणारे असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीत राजकीय पक्षांचे झेंडे दिसू नयेत अशी विनंती आपण कुलगुरुंकडे केली असल्याचं ते म्हणाले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या आरोपांबाबत आपण सहमत नसल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच अजित पवार यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी पक्षाला महायुतीमधून काढून टाकण्याचा प्रयत्न असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. उलट महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वगळण्याचा इतर दोन पक्षांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.