आषाढी एकादशी राज्यभरात पारंपरिक उत्साहात काल साजरी करण्यात आली.बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं संत गजानन महाराज संस्थानमध्ये गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात नंदवाळ इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन कीर्तन आणि दिंडी काढून विठू नामाचा गजर सुरू होता.
परभणी जिल्ह्यातील मानवत मार्गावरील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात आषाढी यात्रेनिमित्त वृक्षदिंडी तर पालघर जिल्ह्यात वाड्यातल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात व्यसनमुक्तीची दिंडी काढण्यात आली.धुळ्यात अनाथ मतिमंद बाळगृहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.रत्नागिरी,सोलापूर,हिंगोली,जालना,बीड आदि जिल्ह्यात विठ्ठल–रुक्मिणी मंदिरांमधे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.आषाढी एकादशीचा सोहळा काल मराठवाड्यात भक्तिभावाने साजरा झाला.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरातही काल विविध कार्यक्रम पार पडले.शहरातून आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून घेत होते.
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं संत जगमित्र नागा मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तसंच जगमित्र महाराजांच्या समाधी स्थळास फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री क्षेत्र नारायण गडावर देखील लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते.