राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत; त्यामुळे विविध राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, प्रचार करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या आणि उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठीची लगबग वाढली आहे.
प्रधानम आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पुण्यात प्रचार सभा घेणार आहेत. तत्पूर्वी आज दुपारी चिमुर आणि नंतर सोलापूर इथंही मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत दोन सभांना संबोधित करतील.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे देखील चिखली आणि गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जालना जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. मराठवाडा आणि दुष्काळ हे दोन शब्द आपल्याला वेगळे करायचे असून, विकासाच्या माध्यमातून मराठवाड्याला न्याय द्यायचा आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.
काँग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं केली. महायुतीच्या योजनांना विरोध करणारे महाविकास आघाडीतील नेते आपल्या जाहीरनाम्यात त्याच योजना नव्या नावाने राबवण्याचं आश्वासन देत आहेत, असं बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल नंदूरबारमध्ये प्रचारसभा झाली. महायुती सरकारनं राज्यातल्या जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचं त्यांनी सांगितलं. आदिवासी शिक्षण, आरोग्य, पेसा, भरती यावर काम करून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचं पवार म्हणाले.
महाराष्ट्राला देशातलं पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा भाजपचा संकल्प असून, राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी गतिमान विकास हे भाजपचं ध्येय आहे, असं भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत भजापाच्या संकल्पपत्राची माहिती देताना ते बोलत होते.