प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार-विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं रेल्वे मंत्रालयाच्या २४ हजार६५७ कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. महाराष्ट्रासह ओदिशा, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमधल्या १४ जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातल्या जालना – जळगाव ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचाही समावेश आहे. या मार्गामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात समावेश असणाऱ्या अजिंठा लेण्यांकडे जाणं सोयीचं होणार आहे. तसंच विदर्भ आणि मराठवाडा भागासाठीही हा मार्ग फायदेशीर ठरणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.