राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा सुरू आहेत. राज्यात भाजप विधिमंडळ गटनेता निवडीसाठी पक्षानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या ४ डिसेंबरला होणार असून त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. शपथविधीच्या तयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इतर केंद्रीय मंत्री, तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे. त्याखेरीज साधू महंत, कलाकार, आणि साहित्यिकांनाही निमंत्रित केलं जाणार आहे.