भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं केवळ अंतरिक्ष क्षेत्रातच नव्हे तर देशाच्या सामाजिक आर्थिक विकासातही महत्त्वाचे योगदान दिल्याचं प्रतिपादन काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. पहिल्या राष्ट्रीय अंतरिक्ष दिनाच्या कार्यक्रमात त्या काल दिल्ली इथं संबोधित करत होत्या. अंतरिक्ष क्षेत्रातल्या प्रगतीमुळे आरोग्य, वाहातूक, पर्यावरण, उर्जासुरक्षा, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांना लाभभ झाला आहे असे सांगून राष्ट्रपती म्हणाल्या की, अंतराळ संशोधनामुळे मानवी क्षमतांमध्ये वाढ झाली आहे. कल्पना वास्तवात रुपांतरीत होऊ शकल्या तसंच विश्वाची रहस्येही उलगडत आहेत.
इस्रोचं चांद्रयान चंद्रावर उतरले तो क्षण देशवासियांसाठी गौरवशाली होता असं सांगून त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस साजरा करणं हे कौतुकास्पद पाऊल आहे. भारतीय अंतरिक्ष क्षेत्राची झालेली वृद्धी विलक्षण असून, किमान संसाधनांतून आकाराला आलेली मंगळयान मोहिम असो किंवा एकाच वेळी 100 उपग्रह प्रक्षेपित करणे असो, अनेक पराक्रम इस्रोनं केले आहेत. इस्रोच्या 2030 पर्यंत कचरामुक्त अंतरिक्षमोहिमा करण्याच्या योजनेचे कौतुक राष्ट्रपतींनी केलं.
अंतरिक्ष राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले की, गेली सत्तर वर्ष स्वतःच लादून घेतलेल्या गुप्ततेच्या पडद्याआड काम करत राहिल्यानं हे क्षेत्र ज्ञान आणि संसाधनं यांच्यापासून वंचित राहिले होते. राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस देशभरात मंत्रालये, विविध विभाग, शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांच्या सहभागातून साजरा होत असल्याचं इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितलं. दरम्यान, याच कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते इस्रो आयोजित रोबोटिक्स चॅलेंज आणि भारतीय अंतराळ हॅकेथॉन स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीसेही देण्यात आली.