नीट परीक्षा घोटाळ्यातल्या आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयापुढं आज हजर केलं असता न्यायालयानं त्याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली.
याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण चार जणांवर गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत त्यापैकी २ आरोपींना अटक केली आहे. नीट परीक्षा देणाऱ्या १२ विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रं आरोपी संजय जाधव आणि जलीलखान पठाण यांच्या मोबाईलमध्ये आढळून आली आहेत. त्यानुसार ते विद्यार्थी आणि पालकांकडून नीट परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करत असत. याकामी धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथला ईरन्ना कोनगुलवार आणि दिल्लीत राहणारा गंगाधर नावाचा आरोपी मदत करीत असत, असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, ईरन्ना कोनगुलवारलाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गंगाधरचा शोध लातूर पोलीस शोध घेत आहेत.