पाणीटंचाई असणाऱ्या शहरात विकासकाला पर्यायी पाण्याची सोय करण्याच्या, हे खरेदीदाराला करारपत्रात लिहून देण्याच्या आणि हे ‘रेरा’ला कळवण्याच्या सूचना नगरविकास विभागामार्फत देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. चेतन तुपे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. पाणी वितरण व्यवस्था नव्याने तयार करून, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्यात येत आहे, असंही फडनवीस म्हणाले.
भुशी धरणात पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. भुशी धऱणात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणाही अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभा सदस्य चेतन तुपे यांनी यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या निधीद्वारे संभाव्य धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक माहिती फलक लावणं, कुंपण घालणं, सुरक्षिततेसाठी जाळ्या लावणं आदी कामं करण्यात येतील, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
महाराष्ट्र सेवा हमी योजनेचा आढावा मुख्यमंत्री घेतील, तसंच वेळेत काम न करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत दिली. प्रकाश आबिटकर यांनी याविषयी लक्षवेधी उपस्थित केली होती.
पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना संरक्षण देण्यासाठी पर्ससीन आणि एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर आर्थिक दंडासह गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना वैभव नाईक यांनी उपस्थित केली होती. महेश बालदी, नितेश राणे, जयंत पाटील यांनी उप प्रश्न विचारले.