उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातल्या फुलराई गावात सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज भेट घेतली. त्यानंतर मंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी सरकारने विशेष तपास पथक स्थापन केल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. या पथकाने प्राथमिक अहवाल सादर केला असून घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, निवृत्त प्रशासकीय अधिकारीदेखील या चौकशी समितीचा भाग असतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या दुर्घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख तर जखमींना एक लाख रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
Site Admin | July 3, 2024 7:22 PM | दुर्घटना | हाथरस