आंध्रप्रदेशात आलेल्या पुरामुळे अंदाजे दीड लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, २ लाख शेतकाऱ्यांना फटका बसला आहे असं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. विशेषत: हळद आणि फूल पिकांना अतिवृष्टीची झळ बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील पूरस्थितीची पाहणी करण्याकरता चौहान कालपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी विजयवाडा, प्रकाशम धरण तसंच कृष्णा नदी लगतच्या पूरग्रस्त शेतांची हवाई पाहणी केली. पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, दोन्ही राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. पुरानंतर उद्भवलेली परिस्थिति सामान्य होण्यासाठी तसंच पिकं आणि दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंची भरपाई सरकारकडून देण्यात येईल असं ते पुढे म्हणाले. आज ते तेलंगणातील खम्मम जिल्ह्याला भेट देणार आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात पुरामुळे झालेलं नुकसान लक्षात घेऊन, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी पुरग्रस्तांना पूर्ण मदत करावी असे निर्देश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिले आहेत.
Site Admin | September 6, 2024 10:24 AM | Andhra Pradesh | Flood | Shivraj Singh Chouhan | Telangana