आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथे आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाना मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी काल मदतीची घोषणा केली. विजयवाडा इथल्या सर्व ३२ प्रभागांमध्ये नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल, तसंच पूरबाधित घरांची दुरुस्तीही केली जाईल, असं मुख्यमंत्री नायडू यावेळी म्हणाले.
पूरग्रस्त भागात तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. इतर बाधित भागातल्या रहिवाशांनाही १० हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या भागातल्या दुकानदारांनाही २५ हजार रुपये मदत म्हणून मिळणार आहे. तसंच, ४० लाख रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या नोंदणीकृत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना ५० हजार रुपये मदतीसह जीएसटी माफी मिळणार आहे. ४० लाख ते दीड कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या नुकसानग्रस्त उद्योगांना १ लाख रुपये तर त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांना दीड लाख रुपये भरपाई म्हणून दिले जातील, असं नायडू म्हणाले आहेत.