देशाच्या संविधानाचा अमृतमहोत्सव यंदा साजरा करण्यात येणार आहे. उद्यापासून २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वर्षभर त्याअंतर्गत विविध कार्यक्रम होतील. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना या बाबतची माहिती दिली. दिल्लीतल्या संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात एक भव्य कार्यक्रम आयोजित केला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. हा उत्सव देशाचा असून नागरिकांनी त्यात उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं.
“हमारा संविधान हमारा स्वाभिमान” हे या अभियानाचं घोषवाक्य आहे. संविधान साकारण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान तसंच मसुदा समितीतल्या १५ महिला सदस्यांच्या लक्षणीय कामगिरीचा गौरव करणं या अभियानाचं उद्दिष्ट आहे. असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं.
या महोत्सवानिमित्त Constitution75.com हे समर्पित संकेतस्थळ सुरु केलं असून त्यावर विविध प्रकारातून संविधानाविषयीची माहिती उपलब्ध आहे. संविधानाची उद्देशिका वाचतानाच्या ध्वनिचित्रफिती या संकेतस्थळावर कोणलाही चढवता येतील. तसंच त्यावर उपलब्ध प्रश्नमंजुषा सोडवून प्रमाणपत्र मिळवता येईल.