महायुतीचं सरकार राज्यात असेल तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळे इथं व्यक्त केला. लांगुलचालनाच्या भावनेने पछाडलेल्या महाविकास आघाडीने देशाच्या सुरक्षेला वेठीला धरल्याची टीकाही शाह यांनी यावेळी केली. मात्र, केंद्रातल्या सरकारचं देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. काँग्रेसने मात्र प्रगतीत अडथळे आणले.
२००४ ते २०१४पर्यंत काँग्रेसने राज्याला १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला तर त्यानंतर आलेल्या भाजपाशासित सरकारने हीच रक्कम १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांपर्यंत वाढवली, असं ते चाळीसगावमधल्या सभेत म्हणाले. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश या राज्यांत काँग्रेसने दिलेली आश्वासनंही पूर्ण केली नाहीत, अशी टीका शहा यांनी केली. कोरोना काळातल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्तवणुकीवरही त्यांनी टीका केली.
राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असं आश्वासन शहा यांनी परभणी इथं झालेल्या प्रचारसभेत दिलं.