विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात शिगेला पोचला असून, आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा, रोड शो इत्यादींच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आज राज्यात प्रचारदौरा केला.
तत्त्वांसोबत तडजोड करत कसंही करून सत्तेत येणं हा महाविकास आघाडीचा एकमेव उद्देश आहे, तर शिवाजी महाराजांच्या तत्त्वांना अनुसरून महाराष्ट्राला देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणं हा महायुतीचा उद्देश आहे, असं गृहमंत्री अमित शाह रावेर इथल्या प्रचारसभेत म्हणाले. महायुती ही राज्याला समृद्ध करणारी युती आहे. उलेमांनी महाविकास आघाडीला समर्थन देण्यासाठी मुस्लिमांना १० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. अशाप्रकारचं आरक्षण द्यायचं झालं तर ५० टक्के आरक्षणातलं दलित, आदिवासी आणि ओबीसी यांचं आरक्षण काढून द्यावं लागेल. महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. देशाच्या सुरक्षेसाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी महायुतीला मतदान करायचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.