आमच्या सरकारसाठी राज्यघटना ही केवळ दस्ताऐवज नाही तर, वंचितांच्या कल्याणाचा आणि राष्ट्रनिर्माणाचा प्रेरणास्रोत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवानिमित्त झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देत होते. आपलं संविधान, संविधानसभेची रचना, आणि संविधानरचनेची प्रक्रिया संपूर्ण जगातल्या संविधानांनमधे अनोखी आहे, असं ते म्हणाले.
आपल्या राज्यघटनेत मार्गदर्शक सूचनांच्या चौथ्या भागातल्या ४४ व्या कलमात समान नागरी कायद्याचा उल्लेख केला आहे. कारण आपलं संविधान सर्व धर्मांसाठी समान कायद्याच्या बाजूचं आहे, असं ते म्हणाले.
गेल्या ७५ वर्षात आपल्याप्रमाणेत अनेक देश स्वतंत्र झाले. मात्र तिथं लोकशाही यशस्वी झाल्याचं दिसत नाही. पण आपली लोकशाही खोल रुजलेली आहे. रक्ताचा एक थेंबही न सांडवता अनेक बदल आपण घडवून आणले. आर्थिक दृष्ट्या आपण कधीही स्वतंत्र होऊ शकणार नाही, असं त्यावेळी म्हणाऱ्यांना आपल्या देशातल्या जनतेनं आणि आपल्या संविधानानं चोख उत्तर दिलं आहे. आपण ब्रिटनला मागं टाकलं असून आज जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत, असं ते म्हणाले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे झालेल्या चर्चा देशातल्या युवकांसाठी याबाबतीतलं शिक्षण देणाऱ्या ठरतील, असं शहा म्हणाले.