बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभुमीवर, तिथले अंदाजे एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 778 विद्यार्थी जलमार्गानं तर दोनशे विद्यार्थी ढाका आणि चितगाँग विमानतळावरून सुटणाऱ्या नियमित विमानसेवेद्वारे मायदेशी परतले. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ढाकातील भारतीय उच्चायुक्तालय तसंच चितगाँग, राजशाही, सिलहेट आणि खुलना इथल्या सहायक उच्चायुक्तांनी भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यात सहाय्य केलं. या नागरिकांना भारत – बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी देखील उपाययोजना केल्या जात आहेत. भारतीय नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी, नागरी विमान वाहतूक, स्थलांतर, विमानतळ प्राधिकरण तसंच सीमा सुरक्षा दल यांच्या अधिकाऱ्यांशी ते संपर्कात आहेत. ढाका इथलं उच्चायुक्तालय, सहउच्चायुक्तालय अजूनही बांग्लादेशातल्या विविध विद्यापीठात शिकणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्यासाठी संपर्कात असून, नेपाळ तसंच भूतान या देशांतून गेलेल्या विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्यास मदतीचा हात देण्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | July 21, 2024 10:30 AM | परराष्ट्र व्यवहार मंत्रालय | बांग्लादेशआरक्षण