भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती काल देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संसद भवन परिसरात प्रेरणा स्थळ इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरीवंश, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
डॉ. आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचं स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित वृत्तीनं कार्यरत आहे असं पंतप्रधानांनी समाजमध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
मुंबईत चैत्यभूमीवर राजकीय नेत्यांसह नागरिकांनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी काल पहाटेपासून गर्दी केली होती. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. आधुनिक भारताचा पाया त्यांनी रचला असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या अभिवादन सोहळ्यात केलं. तर एकसंघ भारताचं श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या संविधानाला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले ..
जी समता आणि बंधुता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. आपल्या संविधानाचा जो गाभा आहे हा आपत्याला भगवान गौतम बुद्धांच्या विचारातनंच तयार झालेला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच हा शाश्वत विचार जो जगाने स्वीकारलेला विचार हा विचार रुजवण्याचं काम हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज खरं म्हणजे ज्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक बाबासाहेबांची आयोजन आठवण करतो ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना नमन करतो त्यावेळी एकच संकल्प आपण घेतला पाहिजे घेतला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत जी संविधानिक मूल्य आपल्याला सांगितलेली आहे त्या मुल्यापासून आपण दूर होणार नाही भारताच संविधान हे आपल्याकरता सर्वोच्च असेल आणि या संविधानानेच चालण्याचा प्रयत्न आपण करू संविधानाने चालण्याचा प्रयत्न आपण करू
चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमी इथं वृक्षारोपण केलं. तसंच अखंड भीम ज्योतीला अभिवादन केलं.
नागपूरमध्ये, दीक्षाभूमीवर तसंच संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या.
डॉ. आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या मूळ गावी सामाजिक न्याय आणि विशेष साह्य विभागाच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, सामंत आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि अस्थिकलश स्थानी पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जगभरातून अभ्यासक आणि पर्यटक येतील असं भव्य-दिव्य स्मारक आंबडवे गावी उभारलं जाईल असं आश्वासन सामंत यांनी या वेळी दिलं. तर मंडणगडमध्ये एक हजार एकरमध्ये एमआयडीसी उभारण्यात येईल, त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन स्थलांतर थांबण्यास मदत होईल अशी घोषणा कदम यांनी या वेळी केली.
संपूर्ण समाज कायम एकसंध राहायला हवा ही बाबासाहेबांची इच्छा होती, तिची पूर्तता करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यात बोलताना सांगितलं. सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.