परभणीमधल्या संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परभणीत जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर, दानवे यांनी नुकसान झालेल्या व्यापारी आस्थापनांची, तसंच इतर ठिकाणांची पाहणी केली.
दरम्यान, काल झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आस्थापना बंद ठेवण्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत आज व्यापारी संघाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन म्हणणं मांडलं. त्यावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांना आश्वस्त करत आस्थापना चालू ठेवण्याचं आवाहन केलं.
या घटनेचा निषेधार्थ बीड जिल्ह्यात परळीतल्या व्यापारी महासंघ आणि आंबेडकर अनुयायांच्या वतीने उद्या परळी शहर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.