अमरनाथ यात्रेला आज सुरुवात झाली. अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतल्या भगवती नगर बेस कॅम्प इथून आज पहाटे चार हजार २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी रवाना झाली. कडेकोट सुरक्षेसह यात्रेकरूंच्या २०० वाहनांचा ताफा काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला. तत्पूर्वी बेस कॅम्पचा परिसर बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. जम्मू बेस कॅम्प इथून आतापर्यंत आठ हजार ६३२ यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टर सेवेद्वारे पोहोचलेल्या तीन हजारहून अधिक यात्रेकरूंनी आज पवित्र गुफेत शिवलिंगाचे दर्शन घेतले. प्रधानंमत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अमरनाथ यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आहेत. बाबा बर्फानी यांची पूजा आणि दर्शनाशी निगडीत ही यात्रा शिवभक्तांना उपार ऊर्जा प्रदान करते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ५२ दिवस चालणारी ही यात्रा १९ ऑगस्टला असणाऱ्या श्रावण पौर्णिमेला संपणार आहे.