भाजपाचं नेतृत्व केवळ बड्या भांडवलदारांच्या हिताचा विचार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. झारखंडमधल्या धनबाद जिल्ह्यातल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. देशात अनुसूचीत जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या सर्वात जास्त असूनही त्यांना सरकारी संस्थांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही असंही गांधी म्हणाले. तर छत्तरपूर इथं झालेल्या सभेत भाजपा नेते अमित शहा यांनी राहुल गांधी हे ओबीसी, दलित, आदिवासींच्या विरोधात असल्याची टीका केली.
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. तर राजद आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनीही झारखंडच्या विविध भागात प्रचारसभांना संबोधित केलं. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.