मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू असून यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईत गिरगाव चौपाटीवरून झाली. हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातल्या नागरी आणि ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसंच, ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांअंतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जवळपास 3 हजारांहून अधिक नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता मोहीम राबवली.
पनवेल महापालिकेनं चारही प्रभागात कचऱ्याची साठवण केलेल्या दुर्लक्षित ठिकाणी स्वच्छतेचं नियोजन केलं आहे. यासाठी आत्तापर्यंत राबवलेल्या मोहिमेत पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेत २४ टनापेक्षा जास्त कचरा गोळा केला.
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेतर्फे उपस्थित विद्यार्थी, नागरिक स्वच्छता कर्मचारी यांना स्वच्छता शपथ देऊन आज अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर शिरपूर शहराजवळच्या अरुणावती नदी पात्रात स्वच्छता करण्यात आली.
चंद्रपुरातही महापालिका क्षेत्रातून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली गेली. त्याअंतर्गत जटपुरा गेट ते रामाळा तलावापर्यंत सफाई मोहीम राबवली गेली. प्रशासनानं गर्दीची ठिकाणं, बगीचे आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्याचं नियोजन केलं आहे. अकोल्यात जिल्हाभरातल्या ८०० ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीमेअंतर्गत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली.
अकोल्यात जिल्हाभरातल्या ८०० ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीमेअंतर्गत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. अकोला जिल्हापरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांना डीग्निटी कार्डाचं वितरण करून या अभियानाला सुरुवात केली गेली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छताविषयक जनजागृतीपर पथनाट्यही सादर केलं. बोरीवलीतल्या आकाशवाणी कर्मचारी वसाहतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक पेड मां के नाम ही मोहीम राबवत वृक्षारोपण केलं.